नवी दिल्ली : स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर विभव कुमार यांच्याविरुद्ध गैरवर्तन प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी आज स्वाती मालीवाल यांचा जबाब नोंदवला. यानंतर आता विभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभव कुमार यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 354, 506, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दिल्ली पोलीस स्वाती मालीवाल यांच्या निवासस्थानी ४ तासांपेक्षा जास्त वेळ होते. यावेळी गैरवर्तनप्रकरणी स्वाती मालीवाल यांचा जबाब नोंदवला आहे. स्वाती मालीवाल यांनी आपल्या तक्रारीत १३ मे रोजी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. तक्रारीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांच्यासोबत जे काही घडले ते सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव नाही आहे.
याआधी राष्ट्रीय महिला आयोगाने विभव कुमार यांना समन्स बजावले होते. यानुसार विभव कुमार यांना 17 मे रोजी सकाळी 11 वाजता हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्यावर आपच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी गैरवर्तनाचा आरोप केला होता. मात्र, याप्रकरणी आपक्षाकडून कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले होते.