नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संसद मार्गावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात (Rahul Gandhi Tractor Rally) दिल्ली पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, हे ट्रॅक्टर कंटेनरमधून रॅलीसाठी दिल्लीत आणण्यात आले आणि याकरता एका खासदाराच्या पत्राचा वापर करण्यात आला.
कोरोना काळ आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन, या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असतानाही हाय सिक्योरिटी झोनमध्ये ट्रॅक्टर घेऊन जाण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी आधीच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांना ट्रॅक्टर आणि कंटेनरच्या मालखाची ओळख पटली आहे आणि त्यांना चोकशीसाठी नोटीसही पाठवण्यात येणार आहे.
Farm Laws: कृषी कायदे मागे घ्या; राहुल गांधीची मागणी, ट्रॅक्टर चालवत संसदेत एन्ट्री
काय लिहिले होते खासदाराच्या पत्रात -दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरमध्ये घरगुती सामान आहे, असे खासदाराच्या पत्रात लिहिलेले होते. मात्र, त्यात ट्रॅक्टर आणण्यात आले. या दोन्ही वाहनांचे माल सोनीपत येथील आहेत. ट्रॅक्टरचा माल सोनिपतमधील बिंदरौली येथील आहे. तर कंटेनरचा मालक सोनीपतमधील बाडखालसा भागातील असल्याचे समजते.
दिल्ली पोलिसांत राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावरून आता दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधींसह काही काँग्रेस नेत्यांवर भा.दं.वि. कलम 188 आणि महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हे ट्रॅक्टरही जप्त केले आहे.
"रॅलीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती" -दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, काँग्रेसकडून या ट्रॅक्टर रॅलीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच, या ट्रॅक्टरच्या पुढे-मागे नंबर प्लेटही नव्हती. तसेच नवी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर चालविण्यास बंदी आहे. त्यामुळे काँग्रेसने जाहिररित्या मोटार अॅक्टचे उल्लंघन केले आहे, असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.