नवी दिल्ली :ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बेंगळुरू येथून दिशा रवि हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून निकिता जेकब यांना फरार घोषित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. निकिता जेकब या दिशा रविची जवळची सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. (delhi police summons non bailable warrant out for activist nikita jacob in toolkit case)
निकिता जेकब या मुंबई उच्च न्यायालयात वकिल म्हणून काम करतात. निकिता जेकब (nikita jacob) यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे.
दिशा रविला ५ दिवसांची पोलीस कोठडी
पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या दिशा रविला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्यांशी संबंधित टूलकिट सोशल मीडियावर शेअर केल्याच्या प्रकरणात दिशा रवीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा
निकिता जेकब गायब
सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या निकिता जेकब यांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, विशेष तपास पथकाचे अधिकारी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या परागंदा झाल्या, असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी निकिता जेकब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होईल.
खलिस्तानाशी संबंध असल्याचा संशय
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, खलिस्तान संघटनेशी निगडीत एमओ धालीवाल यांनी त्यांचा सहकारी पुनीतच्या माध्यमातून निकिता जेकब यांच्याशी संपर्क साधला होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्विटरवर स्टॉर्म निर्माण करणे, असा हेतू त्यांचा होता. यापूर्वीही निकिता जेकब यांनी पर्यावरणाशी संबंधित मुद्दे उचलून धरले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरातून पोलिसांनी तिला अटक केली. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आले.