नवी दिल्ली - भारतातील महत्त्वाची ठिकाणं ही अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतात. विविध प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांचे डॉग स्कॉड महत्त्वाची भूमिका बजावत असतं. दिल्लीपोलिसांचा 'बाबू' हा श्वान देशातील टॉप डॉग ठरला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे व सभांवेळी बाबू सुरक्षिततेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतो. वासावरुन माग काढण्यात तो तरबेज आहे. ऑल इंडिया पुलिस स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून बाबू या श्वानाने इतर श्वानांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
'बाबू' प्रमाणेच त्याची बहीण 'बेब' सुद्धा वासावरुन माग काढण्यात तरबेज आहे. बेबने नोव्हेंबर 2018 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. श्वानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 40 श्वानांनी सहभाग घेतला होता. या भावा-बहिणीच्या जोडीने पोलिसांना अनेक महत्त्वपूर्ण केसेस सोडवण्यात खूप मदत केली आहे. काही श्वान एखाद्या आरोपीचा शोध घेण्यासाठी खूप वेळ लावतात किंवा हवे तसे सहकार्य करत नाहीत असे एका डॉग हँडलर्स (श्वानांचा सांभाळ करणारे) ने म्हटलं आहे. मात्र 'बाबू' आणि त्याची बहीण 'बेब' काही तासांतच आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांना मदत करतात.
बाबू आणि बेब या दोन्ही श्वानांचे पालन-पोषण पंजाबमध्ये करण्यात आले. त्यानंतर मेरठमध्ये आर्मीच्या वेटिनरी युनिटमध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यात आले. 2017 पासून हे दोन्ही श्वान दिल्ली पोलिसांच्या के9 युनिटमध्ये कार्यरत आहेत. बाबूचे हँडलर एचसी पवन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू खूप चपळ आहे. नेहमी सगळीकडे उड्या मारत फिरत असतो. मात्र त्याला कधी शांत राहायचं हे चांगलंच माहीत आहे. बाबू हा लॅब्रडॉर श्वान असून तो पोलिसांना मदत करतो. बाबू आणि बेबला दररोज ट्रेनिंग दिलं जातं. श्वानांसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असेल तर त्या आधी बाबूला डायएवर ठेवलं जातं. तसेच त्याचे नियमितपणे मेडिकल चेकअप केलं जातं. 'बाबू' आणि त्याची बहीण 'बेब' यांनी पोलिसांना मदत करून दमदार कामगिरी केली आहे.