महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार अचानक नॉटरिचेबल झाले होते. यानंतरचा राजकीय भूकंप अवघ्या देशाने पाहिला आहे. असे असताना आता दिल्लीमध्ये आपचे आमदार नॉटरिचेबल झाले आहेत. यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी बैठक बोलावली आहे.
आम आदमी पक्षाचे अनेक आमदारांशी संपर्क होत नसल्याची बाब समोर येत आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. महत्वाचे म्हणजे केजरीवाल यांनी आज सकाळी ११ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती, त्यापूर्वीच आपचे आमदार नॉट रिचेबल झाल्याने बिहारमध्ये फसलेले ऑपरेशन दिल्लीत सफल होते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आपच्या 4 आमदारांनी भाजपवर 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला होता. यामुळे आपचे आमदार फुटण्याची भीती वाटू लागल्याने आपच्या पॉलिटीकल अफेअर्सच्या बैठकीत सर्व आमदारांना बोलावण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र, आजच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे कळविण्यासाठी पक्षाकडून फोन केले जात असतानाच अनेक आमदार संपर्काबाहेर गेल्याचे समोर आले आहे. दिल्लीत आपचे ६२ आमदार आहेत.
भाजपचे लोक आमच्या आमदारांना भेटायला येत आहेत. तसेच मनीष सिसोदियांसारखे खोटे गुन्हे दाखल करू, अशी धमकी देत आहेत असा आरोप बुधवारीच आपचे आमदार संजय सिंह यांनी केला होता. सिसोदियांविरोधातील कारस्थान फसल्याने आता आपच्या आमदारांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी २०-२५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप केला आहे. सिसोदियांनी देखील काही दिवसांपूर्वी आपल्यालाही धमकीवजा ऑफर होती असा आरोप केला आहे.