नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता(Delhi AQI)दिवसेंदिवस खराब होत आहेत. दिल्लीची हवा सुधारण्यासाठी केलेले सर्व आपत्कालीन उपाय अपयशी ठरताना दिसत आहेत. गुरुवारी सलग पाचव्या दिवशीही शहरातील हवा 'अतिशय खराब' पातळीवर राहिली. पर्यावरणावर देखरेख करणार्या SAFAR-India एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस खराब होत आहे. एजन्सीने सांगितल्यानुसार, दिल्लीच्या काही भागात पीएम 2.5 ची पातळी 300 च्या आसपास आहे. जागतिक आरोग्य संघटनेने PM 2.5 ची सुरक्षित पातळी 25 पर्यंत सूचीबद्ध केली आहे. यावरून राष्ट्रीय राजधानीतील हवेचा दर्जा किती खालावला आहे, याचा अंदाज बांधता येतो.
PM 2.5 म्हणजे काय ?
PM 2.5 हा हवेत विरघळलेला एक छोटासा पदार्थ आहे. या कणांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी आहे. जेव्हा पीएम 2.5 ची पातळी जास्त असते तेव्हाच धुके वाढते आणि दृश्यमानतेची पातळी घसरते. PM-2.5 चा कण किती लहान आहे हे जाणून घेण्यासाठी हे लक्षात घ्या. (माणसाचे केस सुमारे 100 मायक्रोमीटर आहेत, PM 2.5 चे सुमारे 40 कण केसाच्या रुंदीवर ठेवले जाऊ शकतात.)
फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढला
श्वास घेताना धुळीचे हे कण थांबवण्याची कोणतीही यंत्रणा आपल्या शरीरात नाही. अशा परिस्थितीत पीएम 2.5 आपल्या फुफ्फुसात खोलवर पोहोचतात. PM 2.5 मुळे मुले आणि वृद्धांना सर्वात जास्त त्रास होतो. त्यामुळे डोळे, घसा आणि फुफ्फुसाचा त्रास वाढतो. तसेच खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. सततच्या संपर्कात राहिल्याने फुफ्फुसाचा कर्करोगही होऊ शकतो.
प्रशासन उपाययोजना करत आहे
दिल्लीतील प्रदूषणाची वाढती पातळी पाहता दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने प्रदूषण करणाऱ्या वाहनांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राशिवाय (पीयूसी) पेट्रोल भरताना आता 10 हजार रुपयांचे चलन कापले जात आहे. यासाठी परिवहन विभागाने पेट्रोल पंपावर परिवहन विभाग आणि नागरी संरक्षण स्वयंसेवकांची पथके तैनात केली आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह अनेक राज्य सरकारांना फटकारले आहे. यामुळेच एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) ने केंद्र, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि यूपीसह राज्य सरकारांसोबत संयुक्त बैठक घेऊन अनेक निर्बंध लादले आहेत.