नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषण मंगळवारी अतिशय गंभीर स्तरावर पोहोचले असून, धुक्याच्या गडद चादरीमुळे आज दिल्लीत हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता यात मोठी घसरण झाली आहे. हवेची गुणवत्ता चिंताजनक झाल्याने, दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी फिरणेही अवघड झाले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने हवेच्या गुणवत्तेला अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ प्रदूषण अतिशय गंभीर स्तरावर पोहोचले आहे. मंगळवारी सकाळी प्रदूषण बोर्डाने हवेची गुणवत्ता तपासली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासाठी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाकडून उपाययोजना केल्या जाऊ शकतात.यात पार्किंग शुल्क चारपट वाढविले जाऊ शकते. हीच स्थिती आगामी ४८ तास कायम राहिल्यास ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लाननुसार (जीआरएपी) शाळा काही कालावधीसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत, तसेच सम-विषम वाहन योजना पुन्हा सुरू होणार आहे. या आधी २० आॅक्टोबर रोजीही दिल्लीतील हवेची गुणवत्ता चिंताजनक होती.अशा हवेमुळे लोकांना श्वासासंबंधी त्रास होऊ शकतो. श्वास आणि हृदय व रक्तवाहिन्यांचा त्रास असलेल्या नागरिकांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे एयर लॅब प्रमुख दीपांकर साहा यांनी सांगितले की, हवा अजिबात वाहात नसून, त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. शेजारील पंजाब आणि हरयाणा राज्यांत या काळात शेतीमधील काडीकचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, तसेच नोएडा व गाझियाबादमध्येही हवा अतिशय वाईट आहे.वाढते प्रदूषण पाहता, दिल्लीतील शाळा काही दिवस बंद ठेवाव्यात, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना सांगितले. सिसोदिया यांच्याकडे शिक्षण खाते आहे. त्यांचे खाते या संबंधात आदेश काढला आहे. मात्र, आजही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय कमी होती. इंडियन मेडिकल असोसिएशननेही शाळांमध्ये खुल्या मैदानात होणारे खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटी थांबवाव्यात, असे आवाहन सरकारला केले आहे. तसे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण होऊ शकेल. दिल्लीतील हाफ मॅरेथॉनही रद्द करण्याची मागणीही मेडिकल असोसिऐशनने केली आहे.जवानांना दिले ९००० मास्ककेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जवानांना ९००० मास्कचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. आयएसएफचे हे जवान विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि अन्य सरकारी मंत्रालयात तैनात आहेत. खुल्या जागेत ड्युटी करत असलेल्या जवानांना विषारी वायूपासून बचाव करता यावा, म्हणून हे मास्क देण्यात आले आहेत. पोलिसांनाही असे मास्क दरवर्षी देण्यात येतात.
दिल्लीत प्रदूषणाचा कहर, शाळांना सुट्टीजाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 5:02 AM