दिल्लीलाप्रदूषणाने विळखा घातला आहे. दिल्लीच्या लोकनायक जय प्रकाश नारायण रुग्णालयाच्या (एलएनजेपी) ओपीडीमध्ये गुरुवारी सकाळी श्वासोच्छवास आणि संसर्गाची तक्रार करणाऱ्या रुग्णांची मोठी गर्दी दिसून आली. रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपासून येथे हे दृश्य आहे आणि रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आम्ही यापैकी अनेक रुग्णांशी बोललो, काहींना श्वसनाचे आजार आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले की, शहरातील विषारी हवेमुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. तर काहींनी त्यांना दिवाळीपासून सतत खोकला आणि शिंका येत असल्याचं म्हटलं आहे. त्यामध्ये मुलांचा आणि वृद्धांचा समावेश होता.
दिल्लीची रहिवासी फातिमा रहमान म्हणाली की, 'मी माझ्या 6 वर्षाच्या मुलासोबत येथे आले आहे. त्याचा घसा दुखत असून सतत खोकला येतो. जवळच्या दवाखान्यात गेलो, पण खूप गर्दी होती. म्हणून मी दिलशाद गार्डनमधून एलएनजेपी रुग्णालयामध्ये आले. सकाळी 6 वाजता ओपीडी कार्डवर घेण्यासाठी आली. इथेही गर्दी आहे, पण मला आशा आहे की इथल्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे माझ्या मुलाला थोडा आराम मिळेल. मी तीन तास येथे उभी आहे. डॉक्टरांकडे जाण्यासाठी रुग्ण 3 ते 4 तास थांबले होते.
रुग्णालयातील कर्मचार्यांनी आम्हाला सांगितले की ओपीडीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत असते आणि प्रचंड गर्दीमुळे गोष्टी मॅनेज करणं कठीण होतं. 60 वर्षांच्या कमला देवी डॉक्टरांना भेटण्यासाठी वाट पाहत होत्या. त्या म्हणाल्या, 'हिवाळ्याचा काळ हा माझ्यासाठी कठीण काळ आहे. मी सांधेदुखीची रुग्ण आहे. माझे संपूर्ण शरीर दुखते. या विषारी हवेत आपण रोज श्वास घेत आहोत. माझ्या वयाच्या लोकांसाठी ते कठीण होते. मला आशा आहे की इथून औषध घेतल्यानंतर मला बरं वाटेल.
LNJP च्या OPD मध्ये साधारणपणे दररोज 500-600 लोकांची गर्दी होते, आता त्यापेक्षा दुप्पट गर्दी होत आहे. LNJP हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार यांनी सांगितले की, 'विषारी हवेमुळे गंभीर आजार होतात. श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करणाऱ्या लोकांची प्रकरणे वाढत आहेत. दरवर्षी असेच घडते. या काळात लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसतो. येथे चिंतेची बाब अशी आहे की दिल्लीत केवळ दीर्घकालीन श्वसनविकाराचे रुग्णच नाही तर निरोगी लोकांनाही श्वास घेण्यास त्रास होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"