दिल्लीमध्येप्रदूषणाची एवढी मोठी समस्या निर्माण झाली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण राजधानीमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यास सांगितले आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीसोबतच शेजारच्या एनसीआरमध्ये देखीस लॉकडाऊन लावण्यात यावा अशी मागणी केली आहे. अशातच दिल्ली पोलिसांनी पीयुसी सर्टिफिकेटवरून वाहन चालकावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
दिल्लीच्या प्रदूषणाला आजुबाजुच्या राज्यांतील शेतकऱ्यांना जबाबदार धरण्यात येत होते. ते त्यांच्या शेतातील धान्याची खोडवे जाळत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवून जबर दंड तसेच शिक्षा करण्यात येत आहे. परंतू केंद्र सरकारने या शेतीला आग लावल्यामुळे केवळ दिल्लीच्या 10 टक्के प्रदूषणात भर पडत असल्याचे म्हटले आहे. यामुळे दिल्लीवासियच उरलेले 90 टक्के प्रदूषण करत आहेत, असे केंद्राने म्हटले आहे.
या प्रदूषणात दिवाळीला वाजविलेल्या फटाक्यांचा मोठा वाटा असला तरी दिल्लीत धावणाऱ्या वाहनांचाही मोठा वाटा आहे. यामुळे दिल्लीतील जवळपास 400 पेट्रोलपंपांवर दिल्ली पोलिसांनी चलन फाडण्यास सुरुवात केली असून पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांना दणका दिला जात आहे. पेट्रोल भरण्यास आलेल्या वाहनांची पीयुसी आहे का तपासली जात आहे. नसल्यास लगेचच 10000 रुपयांचे चलन फाडले जात आहे.
दिल्लीमध्ये जवळपास 17 लाख अशा गाड्या आहेत, ज्यांची पीयुसी अद्याप बनलेली नाही. या लोकांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जवळपास 2000 हून अधिक पोलिसांना तैनात केले आहे, असे परिवहन विभागाचे सहाय्यक कमिशनर नवलेंद्र सिंह यांनी सांगितले. सोमवारी 35000 गाड्या तपासण्यात आल्या.