दिल्लीच्या राजकारणात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजधानीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. या मुद्द्यावरून आता काँग्रेसही आक्रमक झाली आहे. काँग्रेसनेअरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी त्यांच्या न्याय यात्रेत या मुद्द्यावरून केजरीवाल आणि भाजपा या दोघांवर टीकास्त्र सोडलं आहे. निर्भया घटनेवेळी शीला दीक्षित यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे केजरीवाल बलात्कार आणि लैंगिक छळाच्या ४-५ घटना घडूनही मुख्यमंत्री आतिशी यांच्या राजीनाम्याची मागणी का करत नाहीत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र यादव म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि भाजपा दोघेही दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या जबाबदारीतून सुटू शकत नाहीत. हे दोन्ही पक्ष परस्पर राजकीय वादात अडकून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित न होणे आणि बसेसमधील पॅनिक बटणे अयशस्वी होणे यासारख्या दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या अपयशावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
या चर्चेदरम्यान देवेंद्र यादव यांनी भाजपाच्या 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' घोषणेच्या अपयशाकडे लक्ष वेधलं आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. दिल्लीच्या सद्यस्थितीचे वर्णन करताना त्यांनी ही सरकारची निष्क्रियता असल्याचं म्हटलं. गेल्या काही दिवसांत अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.