नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद 370 हटवल्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता भारतातील गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर संस्थांनी सर्व राज्यांतील पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये जवळपास बारा दहशतवादी घुसले आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) असलेल्या दहशतवाद्यांनी 'जैश-ए-मोहम्मद'च्या तीन ते चार प्रशिक्षित दहशतवाद्यांच्या गटांना दिल्ली, काश्मीर आणि पंजाब येथे 'करो या मरो' या सूत्रानुसार हल्ले करण्यासाठी पाठवले आहे. दहशतवादी संवादासाठी 'दिवाळी फटाके' आणि 'काश्मिरी सफरचंदांचा दिल्लीत पुरवठा' यासारख्या सांकेतिक शब्दांचा वापर करत आहेत. पाच दिवसांपूर्वी काश्मिरमधील एका सफरचंदाच्या बागेत दिल्लीत मोठा घातपात घडविण्याची गुप्त योजना तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
जैशचा जम्मू-काश्मीरचा कमांडर अबू उस्मान यांने हा कट आखला असून या गुप्त योजनेला ‘डी’ असे नाव दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरातील बांदीपोरा जिल्ह्यातील सफरचंद बागेत पाच दिवसांपूर्वी जैश प्रशिक्षित दहशतवाद्यांची बैठक झाली होती. या बैठकीत एक पाकिस्तानी आणि दोन काश्मिरी दहशतवादी उपस्थित होते. अबू उस्मानकडे स्निपर रायफल होती, तर उर्वरित तीन दहशतवाद्यांकडे एके-47, पिस्तूल आणि हँड ग्रेनेड होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. गर्दीच्या ठिकाणांबरोबरच महत्त्वाच्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.
गुप्तचर यंत्रणांना या दहशतवादी कटाबाबत पाच दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. जैश कमांडर अबू उस्मान याने बांदीपोरा भागातील मीर मोहल्ला येथील एका सफरचंदाच्या बागेत ओव्हर ग्राऊंड कामगारांची बैठक घेतली. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलिसांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांमध्ये काश्मिरी, अफगाणी आणि दोन पाकिस्तानी तरुणांचा समावेश आहे. या दहशतवादी टीममध्ये काही आत्मघातकी दहशतवादीही आहेत. दिल्ली, मुंबई, बंगळुरु तसेच कोलकाता यांसह अनेक शहरात हल्ले घडवण्याचा जैश-ए-मोहम्मदचा कट आहे.