नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. अशा स्थितीत दिल्ली सुरक्षेच्या दृष्टीने बालेकिल्ला बनली आहे. १००० चेहरा ओळखणारे कॅमेरे, ड्रोनविरोधी यंत्रणा आणि १०,००० हून अधिक पोलिस लाल किल्ल्यावर आणि आसपास तैनात केले जाणार आहे.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोविड-१९ चे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, यंदाचा स्वातंत्र्यदिन कोणत्याही निर्बंधांशिवाय पूर्ण उत्साहात साजरा केला जाईल. त्यामुळे पोलिसांचा तगडा आणि पुरेसा बंदोबस्त ठेवला जाईल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून माहितीही शेअर करण्यात येईल, असं पाठक म्हणाले.
दिल्ली पोलिस सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. पंतप्रधानांच्या मार्गापासून ते लाल किल्ल्यापर्यंतच्या अनेक किलोमीटरच्या त्रिज्येवर सुरक्षा कर्मचारी आणि गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवणार आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत लाल किल्ल्यावरून वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. केवळ आपत्कालीन आणि विशेष लेबल असलेल्या वाहनांनाच जाण्याची परवानगी असेल. त्याचबरोबर राष्ट्रीय सणाच्या दिवशी सुरक्षेत हलगर्जीपणा होता कामा नये, याचा आढावा घेण्यासाठी रविवारी फुल ड्रेस रिहर्सलही घेण्यात आली.
आज रात्री बॉर्डर बंद केल्या जातील. शाहदरा जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त रोहित मीना यांनी रविवारी यमुना नदीवर गस्त घातली. याशिवाय लाल किल्ल्याच्या भिंतीपासून दिल्लीच्या सीमेपर्यंत चोख आणि ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारपासून सर्व बॉर्डर बंद करण्यात येणार आहेत. कडक तपासणीनंतरच वाहनांना दिल्लीत प्रवेश मिळेल. उत्तर जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळ पीसीआर व्हॅन सतत गस्त घालत आहेत. याशिवाय यमुनेमध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी डायव्हर्ससह दिल्ली पोलिस कमांडो यमुनेमध्ये सतत गस्त घालत असतील.
अनेक रस्ते बंद
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याभोवतीची वाहतूक पहाटे ४ ते १० या वेळेत सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. मंगळवारी नेताजी सुभाष मार्ग, लोथियान रोड, एसपी मुखर्जी मार्ग, चांदणी चौक रोड, निषाद राज मार्ग, एस्प्लानेड रोड आणि त्याचा नेताजी सुभाष मार्ग, रिंग रोड ते राजघाट ते आयएसबीटी आणि आऊटर रिंग रोड ते आयएसबीटी ते आयपी फ्लायओव्हर या ठिकाणी सामान्य वाहतूक मंगळवारी साठी बंद राहणार आहे.