लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : या आठवड्यात पुन्हा पाऊस कोसळला तर दिल्लीतील ५७ वर्षांचा रेकॉर्ड मोडल्या जाईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. संततधार पावसाने दिल्लीतील जीवनमान विस्कळीत झाले असून रस्त्यांनी नदी नाल्यांचे स्वरूप धारण केले आहे.
गुरुवारपर्यंत, दिल्लीमध्ये या मान्सूनमध्ये एकूण ११७०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १९६४ नंतर ५७ वर्षांमध्ये सर्वाधिक पाऊस आहे. गेल्या काही दिवसांत आतापर्यंत दिल्लीत तिसऱ्यांदा सर्वाधिक पाऊस पडला आहे.
यापूर्वी केव्हा...?
१९६४ मध्ये ११९०.९ मिमी पाऊस झाला होता. पुढील दोन दिवस मान्सून सक्रिय राहील आणि गेल्या ५७ वर्षांचे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुरुवारपर्यंत सप्टेंबरमध्ये दिल्लीमध्ये एकूण ४०४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
१९४४ मध्ये ४१७ मिमी पावसाची नोंद आहे. २०१९ मध्ये पावसाळ्यात ४०४ मिमी पाऊस झाला. दिल्लीत साधारणपणे पावसाळ्यात ६५३.६ मिमी पाऊस पडतो. गेल्या वर्षी ६४८.९ मिमी पावसाची नोंद झाली होती.
२५ सप्टेंबरपर्यंत मान्सून दिल्लीहून परतु शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊस २३, २४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. अशा परिस्थितीत दिल्ली आपल्या पावसाच्या दुसऱ्या सर्वाधिक पावसाचा विक्रम मोडू शकते. दिल्लीतील नियम शिथिल झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे; परंतु पावसामुळे संपूर्ण वाहतूक सेवा विस्कळीत होत आहे.