नवी दिल्ली: मान्सूनपूर्व पावसाला उशीर झाल्यानं देशातील अनेक शहरांमधील तापमान वाढलं आहे. राजधानी दिल्लीतीलतापमानानं आज तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले. आज दिल्लीत 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दिल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान आज नोंदवलं गेल्याची माहिती स्कायमेटनं दिली. हवामान खात्यानं पालममध्ये 48 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं.मान्सूनपूर्व पावसाचं आगमन लांबल्यानं तापमान वाढलं आहे. उष्ण वारे वाहत असल्यानं दिल्लीकर मेटाकुटीला आले आहेत. 'दिल्लीच्या पालममध्ये 9 जून 2014 रोजी 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. आज पालममध्ये 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे हा जूनमधील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे,' अशी माहिती स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पालावात यांनी दिली. दिल्लीत सकाळी कडक ऊन पडलं होतं. यानंतर दुपारी उष्ण वारे वाहू लागले. पुढील दोन दिवसदेखील सारखीच परिस्थिती असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. याशिवाय धुळीचं वादळदेखील येण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत पारा 50 अंशांच्या आसपास पोहोचला असताना राजस्थानमध्ये तापमानानं पन्नाशी पार केली आहे. चुरू भागात पाऱ्यानं पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत.
दिल्ली तापली! पहिल्यांदाच पारा 48 अंश सेल्सिअसवर; सर्व विक्रम मोडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 7:55 PM