साडी हा पेहेराव स्मार्ट ड्रेस नाही असं सांगत एका हॉटेलने साडी नेसून आलेल्या महिलेला हॉटेलमध्ये एन्ट्री देण्यास नकार दिला होता. आता याच रेस्टॉरंटवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. हे हॉटेल विना परवाना चालत होतं. या माहितीनंतर प्रशानसाकडून नोटिस जारी करण्यात आली. आता हॉटेलवर कारवाई करुन हॉटेल बंद करण्यात आलं आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सूर्यन यांनी कारवाईबाबतची माहिती दिली.
दक्षिण दिल्लीतील एका Aquila नावाच्या रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला होता. मागील आठवड्यात एका फेसबुक पोस्टमध्ये या महिलेने संपूर्ण संपूर्ण प्रकार उघडकीस आणला होता. साडी नेसल्यामुळे महिलेला हॉटेलमध्ये प्रवेश दिला नाही. यावरुन हॉटेल स्टाफशी झालेल्या भांडणाचा व्हिडीओही महिलेने पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये एक कर्मचारी साडी स्मार्ट ड्रेस नसल्याचं म्हणत असल्याचं समोर आलं. यावर हॉटेलकडून महिलेनेच कर्माचाऱ्यांशी वाद घातल्याचं म्हटलं आहे. त्या महिलेच्या नावावर रिजर्वेशन नसल्याचं सांगण्यात आलं, जेणेकरुन महिला येथून निघून जाईल आणि परिस्थिती संभाळता येईल, असं हॉटेलकडून सांगण्यात आलं.
२१ सप्टेंबर रोजी परिसरातील सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांना आढळलं, की रेस्टॉरंट परवान्याशिवाय, अस्वच्छ स्थितीत चालत होतं. एवढंच नाही, तर रेस्टॉरंटने सार्वजनिक जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला होता. २४ सप्टेंबर रोजी रेस्टॉरंट बंद करण्याची नोटिस पाठवण्यात आली होती. ४८ तासात रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता या रेस्टॉरंटला टाळं लागलं आहे.