नवी दिल्ली : दिल्लीच्या बल्लीमारान परिसरात असलेल्या राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलमध्ये शाळेची फी वेळेत भरली नाही म्हणून तब्बल ५९ चिमुरड्यांना पाच तास शाळेच्या तळघरात कोंडून ठेवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ४० डिग्री तापमानात काहीही खाण्यास न देता मुलींना उपाशी कोंडून ठेवण्यात आले होते. शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी मुलींचे पालक शाळेत पोहोचले असता त्यांना हा प्रकार समजला.
शाळेने ५९ विद्यार्थिनींना शाळेच्या तळघरात बंद करून ठेवलं होतं. तसेच ज्या खोलीत मुलींना ठेवण्यात आले होते तिथे एक साधा पंखाही नव्हता. मुलींच्या रडण्याचा आवाज बाहेर येत होता. तसेच खोलीला बाहेरून कडी लावण्यात आल्याचा आरोप मुलींच्या पालकांनी केला आहे. अनेक पालकांनी पोलिसांना जून महिन्याची फी भरल्याच्या पावत्या दाखवल्या. ४० डिग्री तापमानात पाच तास मुलींना उपाशी ठेवल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका फरहा डीबा खान यांना विचारलं असता त्यांनी पालकांनाच दमदाटी करत मुलींना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दिल्लीसह देशभरात शाळेच्या या कृत्याबाबत संतापाची लाट उसळली आहे.