Independence Day Security : उद्या, म्हणजेच 15 ऑगस्ट 2024 रोजी भारताचा 78वा स्वातंत्रियदिन आहे. देशभरात याची जय्यत तयारी सुरू आहे. राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. दिल्ली पोलिसांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याभोवती पाळत ठेवण्यासाठी 700 AI आधारित फेस डिटेक्शन CCTV कॅमेरे बसवले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी सलग 11व्यांदा राष्ट्रध्वज फडकवतील आणि देशाला संबोधित करतील. या सोहळ्यासाठी लाल किल्ल्याभोवती चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात दिल्ली पोलीस कोणतीही कसर सोडत नाहीत. लाल किल्ल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशिवाय 10 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान आणि इतर मान्यवरांच्या सुरक्षेसाठी एलिट SWAT कमांडो, तसेच शार्पशूटरची तैनाती करण्यात आली आहे.
एआय कॅमेऱ्यांची नजर; विमानतळ, रेल्वे स्थानके, बसस्थानकांवर सुरक्षा वाढवलीपोलिसांनी सांगितले की, Ai आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हाय रिझोल्यूशन पॅन-टिल्ट-झूम फिचर्स आहेत, ज्याद्वारे दुरुन कोणालाही ओळखले जाऊ शकते. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्टँड, मॉल्स आणि बाजारपेठेत निमलष्करी दलांसह अतिरिक्त सुरक्षा कर्मचा-यांची तुकडीही तैनात करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी राजधानीतील प्रमुख जंक्शनवर आणि लाल किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुमारे 3,000 वाहतूक पोलिस तैनात केले जातील. पोलिसांनी हॉटेल, गेस्ट हाऊस, पार्किंग लॉट आणि रेस्टॉरंट्सभोवती गस्त वाढवली असून भाडेकरू आणि नोकरांची पडताळणी केली जात आहे.