दिल्लीतील सत्ता राबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेमध्ये पारित झाले. त्याबरोबरच दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबतचे अधिकार हे केंद्र सरकारला कायदेशीररीत्या प्राप्त झाले आहेत. हे विधेयक पारित होणे हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे राज्यसभेत हे विधेयक पारित होताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीत आम आदमी पक्षाला हरवणं कठीण दिसत असल्याने भाजपाने चोर दरवाजाने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
दिल्ली सेवा विधेयक पारित झाल्यानंतर संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मोदी सांगतात मी सुप्रीम कोर्टालाही मानत नाही. ज्या देशाचे पंतप्रधान त्या देशातील सर्वोच्च न्यायालयाला मानत नाही. त्या देशाचं काय भविष्य असू शकतं. सुप्रीम कोर्टाने कुठलाही आदेश पारित केला तरी जर आम्हाला तो आदेश आवडला नाही तर मी त्याविरोधात कायदा बनवून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पलटून टाकेन, असे ते सरळ सरळ सांगत आहेत. एवढा अहंकार यांना झाला आहे.
आम आदमी पक्षाला आपण थेट लढतीत हरवू शकत नाही, हे भाजपा समजून चुकला आहे. दिल्लीतील गेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपाचा आम आदमी पक्षाकडून पराभव झाला आहे. दिल्लीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आलेली नाही. २५ वर्षांपासून भाजपा दिल्लीमध्ये वनवास भोगत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला दिल्लीत हरवणं कठीण आहे, याची जाणीव यांना झाली. त्यामुळे यांनी मागून, चोर दरवाजाने दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
आज पारित करण्यात आलेल्या कायद्यात लिहिले आहे की, दिल्ली सरकारमधील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत जेवढे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांबाबतची सर्व धोरणं केंद्र सरकार बनवेल. सर्वांच्या बदल्यांबाबतचं धोरण, कुठला शिपाई कुठलं काम करेल, कुठली फाईल उचलेल याबाबतचे निर्णय हे पंतप्रधान घेणार आहेत. पंतप्रधानांचा हेच काम उरलं आहे का? यासाठी त्यांना जनतेने देशाची सत्ता दिली आहे का? तुम्ही केंद्रातील सत्ता राबवा ना, दिल्लीच्या कामकाजात ढवळाढवळ कशाला करताय? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला.