दिल्लीतील कालकाजी मंदिरात रात्री जागरण सुरू असताना स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले असून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी कालकाजी मंदिरात देवीच्या जागरणाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये रात्री 12.30 च्या सुमारास 1500 ते 1600 लोकांची गर्दी जमली होती. याच दरम्यान, लोक आयोजक आणि व्हीआयपींच्या कुटुंबीयांसाठी बनवलेल्या स्टेजवर चढले, त्यानंतर स्टेज खाली पडला. या दुर्घटनेत स्टेजखाली बसलेले 17 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एका महिलेचा मृत्यू
जखमी झालेल्या 45 वर्षीय महिलेला ऑटोमधून मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. या जागरणमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर बी प्राक पोहोचला होता, त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. याच दरम्यान, मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली.
बी प्राक म्हणाला की, दुर्घटना झाली त्या कालकाजी मंदिरात मी गेलो होतो. लोक जखमी झाले आहेत, मला आशा आहे. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे होवोत. व्यवस्थापकांनी काळजी घ्यायला हवी होती.
जागरण हा खासगी कार्यक्रम होता - पोलीस अधिकारी
'आज तक'ला सांगताना दिल्ली पोलीस अधिकारी म्हणाले, 'हे जागरण 26 वर्षांपासून सुरू होते. मात्र आता आयोजकांनी याची स्केल वाढवली होती. जागरण हा एक खासगी कार्यक्रम होता, ज्यात गर्दीचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आयोजकांची होती. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस तैनात आहेत. या जागरणासाठी एका कंपनीकडून एडिशनल फोर्स मागवण्यात आली होती.
आयोजनाला परवानगी नव्हती - पोलीस
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती, असंही पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.