देशाची राजधानी दिल्लीची पावसामुळे संपूर्ण सिस्टम कोलमडली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. लोकांच्या समस्या व त्रास वाढला आहे. याच दरम्यान, परिस्थितीला तोंड देण्यासाठी दिल्लीचंअरविंद केजरीवाल सरकार पूर्ण मनुष्यबळासह फील्डवर उतरलं आहे. दिल्ली सरकारने सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना फील्डवर राहून व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिल्लीत 40 वर्षांनंतर विक्रमी पाऊस झाला आहे. रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत दिल्लीत 153 मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. 1982 नंतर जुलै महिन्यात एकाच दिवसात विक्रमी पाऊस झाला आहे. आव्हाने वाढत असताना सरकार रस्त्यावर उतरलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांना समस्या असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी लागेल, असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले असून रस्ता स्वच्छ करण्यास सांगितलं आहे. महापौर आणि मंत्र्यांनाही पाहणी करण्यास सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत शनिवारी 126 मिमी पाऊस झाला. मान्सूनच्या एकूण पावसापैकी 15 टक्के पाऊस अवघ्या 12 तासांत झाला. पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. आज दिल्लीचे सर्व मंत्री आणि महापौर समस्याग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. सर्व विभागातील अधिकाऱ्यांची रविवारची सुटी रद्द करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना फील्डवर उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सून वाऱ्यांमुळे दिल्लीसह उत्तर पश्चिम भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. मोसमातील पहिल्या मुसळधार पावसाची नोंद येथे झाली आहे. तब्बल 41 वर्षांनंतर असा पाऊस पडला आहे. दिल्लीच्या हवामान केंद्र सफदरजंग वेधशाळेत रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत 24 तासांत 153 मिमी पावसाची नोंद झाल्याचे आयएमडीने म्हटलं आहे. यापूर्वी 25 जुलै 1982 रोजी 24 तासांत 169.9 मिमी पावसाची नोंद झाली होती.
1958 मध्ये एका दिवसात पडला विक्रमी पाऊस
यापूर्वी 10 जुलै 2003 रोजी दिल्लीत 133.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी 21 जुलै 1958 रोजी आतापर्यंत विक्रमी 266.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत दिल्लीत राहणाऱ्या लोकांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
दिल्लीत मुसळधार पावसामुळे उद्याने, मार्केट आणि हॉस्पिटलचा परिसर पाण्याखाली गेला आहे. रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. गुडघाभर पाण्यातून जाणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक भागात वीज आणि इंटरनेट संपर्कही खंडित झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.