नवी दिल्ली – गेल्या २ महिन्यापासून दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली परंतु यावेळी काही शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केले, थेट लाल किल्ल्यात घुसून शेतकऱ्यांनी धर्मध्वज फडकवला, शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप ज्या दीप सिद्धूवर ठेवण्यात आला आहे तो अद्याप फरार आहे. मात्र दीप सिद्धूचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्याने भाजपा खासदार सनी देओल याच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे.
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर काही हिंसक शेतकऱ्यांनी पोलिसांना मारहाण करत थेट आतमध्ये घुसले, याठिकाणी आंदोलकांनी साहिब निशान फडकवले होते, पंजाबी गायक दीप सिद्धू याच्यावर शेतकरी नेत्यांनी आरोप केले होते, दीप सिद्धूने व्हिडीओत म्हटलंय की, सनी देओलने लोकांचा विश्वासघात केला आहे. मी माझ्या आयुष्यातील २० दिवस सनी देओल माझा भाऊ आहे म्हणून प्रचार केला, भाजपासाठी मतदान मागितलं नव्हतं, मी आरएसएस, भाजपाचा माणूस आहे असं सांगितलं जात आहे, सनी देओल सोशल मीडियात पोस्टवर पोस्ट करत आहेत असं त्याने सांगितले.
तर मी पंजाब आणि येथील लोकांचा आवाज उठवला, पण माझ्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला. मला या गोष्टीची पर्वा नाही की सरकार काय म्हणतं, लोक काय म्हणतात त्यामुळे मी दुखी आहे, बिहारी मजुरांसह शेतात राहिल्याचं दीप सिद्धूने सांगितले, तर ही माणसं मला साथ देतात म्हणून मी त्यांच्यामध्ये राहत आहे, जर मी सरकारचा माणूस असतो तर लग्झरी हॉटेलमध्ये मजेत राहिलो असतो असं त्याने सांगितले, यापूर्वीही दीप सिद्धूचा व्हिडीओ व्हायरल झाला होता,
या व्हिडीओत सिद्धूने माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका असं सांगितलं होतं, तर चौकशीत मी सहभागी होण्यास तयार आहे. २६ जानेवारीला झालेल्या हिंसक आंदोलनानंतर अनेक शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावेळी व्हिडीओ पुराव्याच्या सहाय्याने दीप सिद्धूची ओळख पटली होती.
दीप सिद्धू भाजपाचा माणूस – राकेश टिकैत
भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आरोप लावला आहे की, दीप सिद्धू भाजपाचा माणूस आहे. लाल किल्ल्यावरील घटनेनंतर दीप सिद्धूची गुरदासपूरचे भाजपा खासदार सनी देओल यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर सनी देओलने ट्विट करून दीप सिद्धूचा माझ्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिले होते.