नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तान वारंवार भारताला त्रास देण्याच्या उद्देशानंही काही ना काही कुरापत करत सुटला आहे. याचदरम्यान त्यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान असणारी दिल्ली-लाहोर बस सेवा बंद केली आहे. त्यानंतर आता भारतानंही पाकिस्तानमध्ये सुरू असलेली दिल्ली-लाहोर बस सेवा 12 ऑगस्टपासून कार्यान्वित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. फेब्रुवारी 1999मध्ये ही बससेवा सुरू करण्यात आली होती.2001मध्ये भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर ही बससेवा निलंबित करण्यात आली होती. 2003मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानचे संपर्क व डाक सेवामंत्री मुराद सईद यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बुधवारच्या बैठकीतील निर्णयाला सुसंगत निर्णय घेऊन लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्यात येत आहे.’ पाकिस्तानच्या संपर्क मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात मात्र या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली गेट येथील आंबेडकर स्टेडियम टर्मिनलवरून लाहोर-दिल्ली बस चालविली जाते. दिल्ली परिवहन मंडळाच्या (डीटीसी) बसगाड्या दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाच्या बसगाड्या मंगळवार, गुरुवार व शनिवारी दिल्लीहून लाहोरला रवाना होतात. दरम्यान, पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध औपचारिकरीत्या संपुष्टात आणले आहेत. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत तसेच संसदेच्या संयुक्त अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भारतासोबतचे व्यापारी संबंध संपविण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले, असे पाकिस्तानातील आघाडीचे दैनिक ‘डॉन’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
165 प्रवाशांसह पाकला दाखल झाली एक्स्प्रेसकराचीला जाणा-या थड एक्स्प्रेसने शनिवारी शेवटचा प्रवास केला. 165 प्रवासी असलेल्या या रेल्वेला पुढील प्रवासासाठी पाकिस्तानकडून परवाना मिळाला. 370 कलम रद्द केल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारतासोबतच्या सर्व रेल्वे सेवा संपुष्टात आणल्या आहेत. जोधपूर-कराची ही दोन्ही देशातील शेवटची रेल्वे असेल, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी म्हटले आहे.आंतरराष्ट्रीय सीमेवरील शून्य बिंदूवर (झीरो पॉइंट) पोहोचल्यानंतर प्रवासी दुस-या रेल्वेत बसतील. ४१ वर्षांच्या खंडानंतर १८ फेब्रुवारी २00६ रोजी जोधपूर-कराची या दरम्यान थर एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानकडूनही शनिवारी थड एक्स्प्रेस भारतात दाखल झाली. या रेल्वेची ही अखेरची फेरी होती.