नवी दिल्ली: मोटार वाहन कायद्यातील दुरुस्ती लागू झाल्यामुळे दंडाच्या रकमेत अनेक पटींनी वाढ झाली आहे. या नव्या नियमामुळे अनेकांना फटका बसला आहे. दिल्लीतील एका ट्रक मालकाचं नव्या नियमानं दुहेरी नुकसान झालं आहे. वाहतूक पोलिसांनी एक लाखाहून अधिक रकमेच्या दंडाची पावती फाडल्यानंतर ट्रक मालकाला धक्का बसला. त्यानं कसेबसे पैसे जमवून दंडाची रक्कम जमवली. मात्र पैसे घेऊन चालक फरार झाल्यानं मालकाला मनस्ताप सहन करावा लागला. सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार दिल्लीतील एका ट्रकवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी 1.16 लाखांची पावती फाडली. यानंतर वाहन चालक झब्बू हुसेननं मालक यामिन खान यांच्याशी संपर्क साधला. मालकानं दंडाची रक्कम चालकाकडे दिली. हे पैसे घेऊन चालक फरार झाला. याची तक्रार मालकानं पोलिसांकडे केली. पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या फिरोजपूरमधून अटक केली. यामिन खान यांच्या ट्रकवर वाहतूक पोलिसांनी रेवाडीत कारवाई केली. ट्रकमधून नियमापेक्षा जास्त वजन वाहून नेत असल्यानं पोलिसांनी 1.16 लाखांची पावती फाडली. दंड भरण्यासाठी मालकाकडून पैसे घेतल्यानंतर चालक फरार झाला. तो रेवाडीला पोहोचलाच नाही आणि त्यानं मालकाचं फोन घेणंदेखील टाळलं. यानंतर पोलीस चौकशी करण्यासाठी झब्बूच्या घरी गेले. त्याठिकाणी अचानक झब्बू आला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला.
दंडाची रक्कम घेऊन ट्रक चालक फरार झाला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 3:06 PM