नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. लोकांमध्ये विविध कारणांमुळे वाद होतात. कधी कधी क्षुल्लक कारणांमुळे सुरू झालेले वाद पुढे टोकाला जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयाच्या वापरावरून दोन गटात जोरदार राडा झाला आहे. लाठ्या-काठ्यांनी, दगड-विटांनी एकमेकांवर हल्ला केला. नागरिकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. काहींचं डोकं फुटलं आहे. सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील गीता कॉलनी परिसरात नव्याने सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. या भागात राहणाऱ्या बुद्ध बाजार परिसरातील नागरिक त्याचा वापर करत असतात. मात्र लोकसंख्येच्या मानाने शौचालयांची संख्या कमी असल्यामुळे येथे नंबर लावण्यावरून सतत नागरिकांमध्ये छोटीमोठी भांडणं होत असतात. यासाठी नंबर लावण्याच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर दोन गट आमनेआमने आले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. लोकांनी मिळेल त्या वस्तू एकमेकांवर फेकल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
हाणामारीत अनेक नागरिक जखमी
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त झालेल्या लोक काहीच ऐकून घेण्यास तयार नव्हते. पोलिसांनी जास्तीचा फौजफाटा बोलावून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. लोकांना समजवण्यासाठी, शांत करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. या हाणामारीत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील साधारण पाच ते सहाजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सार्वजनिक शौचालयामुळे नेहमीच होतो वाद
दिल्ली पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, एका गटातील नंदलाल, करण, सचिन, बिरजू, मुकेश हे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गटातील लक्की, ध्रुव, बहुवा आणि अन्य काही जण हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून अनेकांनी चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करायला सुरुवात केली असून यातील आरोपींचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक शौचालयामुळे नेहमीच वाद होत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.