नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबादनंतर देशाची दुसरी ‘बुलेट ट्रेन’ दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावेल. ही रेल्वे ७८२ कि.मी.चे अंतर अवघ्या दोन तास ४० मिनिटांत पार करील. दिल्लीला लखनौमार्गे वाराणसीला जोडण्याच्या या प्रकल्पाला उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वेग देण्यात आला आहे. वाराणसी हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. जपानच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग प्रशस्त केल्यानंतर रेल्वेने आता दिल्ली-वाराणसी ‘बुलेट ट्रेन’ला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हा रेल्वेमार्ग दिल्ली-कोलकाता कॉरिडोरचाही भाग आहे. दिल्ली-वाराणसी मार्गात अलिगड, आग्रा, कानपूर, लखनौ आणि सुलतानपूर ही स्थानकेही असतील. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ४३ हजार कोटी रुपयांचा आहे, तर दिल्ली-कोलकाता संपूर्ण ‘कॉरिडोर’ पूर्ण करण्यासाठी ८४ हजार कोटी रुपये लागू शकतात. हा प्राथमिक अंदाज असून, अंतिम अहवालात हा खर्च वाढूही शकतो. याशिवाय या मार्गावर डबलडेकर रेल्वे चालविण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. दिल्ली-वाराणसी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करीत असलेल्या स्पॅनिश संस्थेच्या अंतरिम अहवालावर रेल्वे बोर्डाने चर्चा केली असून, ही संस्था आपला अंतिम अहवाल नोव्हेंबरमध्ये सादर करणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्ली ते वाराणसी अवघ्या अडीच तासांत?
By admin | Published: June 21, 2016 7:35 AM