नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून त्यांना 65 उमेदवारांनी आव्हान दिले आहे.
केजरीवालांना आव्हान देणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार आहे. यामध्ये काही वकील आहेत, तर काही वृत्तवाहिन्यांचे मालक. मंगळवारी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली होती. केजरीवाल यांना देखील कित्येक तास प्रतीक्षा करावी लागली होती. त्यांच्या आधी 40 हून अधिक उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये एकाचे नाव योगी माथूर आहे. ते येथील स्थानिक वृत्तवाहिनीचे मालक आहेत. माथूर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मी अरविंद केजरीवाल यांना पराभूत करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केजरीवाल मुख्यमंत्री होण्यासाठी लायक नसल्याचे त्यांनी सांगितले.
के. बंसल यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. बंसल व्यवसायाने वकील आहेत. भारतीय लोकशाही पक्षाचा आपण सदस्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी केवळ आश्वासने दिल्याचा आरोप त्यांनी केला. तर शिक्षक पंकज कुमार देखील केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात आहेत. कामगार आणि बस वाहकांच्या नोकऱ्यांच्या धोरणांमध्ये बदल करण्यासाठी पंकज कुमार यांना निवडणूक जिंकायची आहे.