नवी दिल्ली - दिल्ली युनिव्हर्सिटीचे हिंदू कॉलेजचे प्राध्यापक रतनलाल यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्यांनी ज्ञानव्यापी मस्जिदवरील शिवलिंग प्रकरणात केलेल्या टिपण्णामुळे त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. देशात सध्या ज्ञानव्यापी मस्जिदवर शिवलिंग असल्याचा दावा करत वाद निर्माण झाला आहे. त्यावरुन, अनेकजण आपली मतं मांडत आहेत. दरम्यान, प्राध्यापक रतनलाल यांच्या अटकेनंतर विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.
रतनलाल यांच्यावर इंडियन पीनल कोड म्हणजे भादंवि 153A (धर्म, जाति, जन्मस्थळ, निवास, भाषा इत्यादीच्या आधारावर दोन समुदायांत तेढ वाढविण्यास आणि शांति भंग करण्याच्या उद्देशाने कार्य केल्याचा आरोप) आणि 295A (कुठल्याही समुदायाच्या धर्माचा अपमान करुन धार्मिक भावनांना जाणीवपूर्वक ठेस पोहचविणे) च्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रतनलाल यांच्या अटकेनंतर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि एआयएसएने विरोध करत निदर्शने केली आहेत. दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली नॉर्थ डिस्ट्रीक्टच्या सायबर पोलीस ठाण्यात जाणाऱ्या रस्त्याला ब्लॉक केलं आहे.