Delhi Violence: काँग्रेसच्या काळात 887 तर मोदींच्या कार्यकाळात 3400 दंगली, औवेसींनी दिली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 08:55 AM2022-04-19T08:55:03+5:302022-04-19T08:56:18+5:30
असुदुद्दीन औवेसी हे सोशल मीडियावरही फार सक्रीय असणारे नेते आहेत.
नवी दिल्ली - जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, दिल्ली पोलिस आयुक्तांनी जहांगीरपुरीमध्ये काढलेली मिरवणूक परवानगीशिवाय काढण्यात आल्याचे सांगितले. मिरवणूक काढली जात असताना पोलीस काय करत होते? पोलीस तमाशा बघायला बसले होते? मिरवणुकीत शस्त्रांची काय गरज होती? लोकांच्या हातात पिस्तूल होते. तलवार आणि चाकू असणे धार्मिक आहे का? तसेच विविध प्रक्षोभक घोषणाबाजी करण्यात आली, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
असुदुद्दीन औवेसी हे सोशल मीडियावरही फार सक्रीय असणारे नेते आहेत. आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन ते नेहमीच सरकारविरुद्ध आवाज उठवतात. तसेच, आपली मतं आणि भूमिकाही स्पष्ट करत असतात. दिल्ली हिंसाचारानंतर त्यांनी ट्विटची मालिकाच लावली असून या हिंसाचाराच्या घटनांतील माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस सरकार आणि मोदी सरकारच्या कार्यकाळात घडलेल्या दंगलीच्या घटनांची आकडेवारीही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहे.
औवेसींनी भाजपच्या ट्विटर अकाऊंवरील पोस्टचा आणि एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झालेल्या देशातील दंगलींची आकडेवारीच दिली आहे. त्यानुसार, काँग्रेसच्या काळात देशात 887 दंगली झाल्या आहेत. तर, मोदी सरकारच्या 2016 ते 2020 च्या कार्यकाळात जवळपास 3400 दंगली झाल्याचे त्यांनी ट्विटवरुन सांगितले. मोदींनी केलंय, म्हणजे विचारपूर्वकच केलं असेल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. औवेसींनी पार्थ एमएन. या अकाऊंटवरील हे ट्विट रिशेअर केले आहे.
ही तर सरकारची इच्छा
जातीय हिंसाचार तेव्हाच होतो जेव्हा सरकारला हवे असते, सरकारची इच्छा नसते तेव्हा होत नाही. त्यामुळे इथेही सरकारने जातीय हिंसाचार घडू दिला. सर्व काही सरकारसमोर घडत आहे, ज्याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारवर येते. दोन मिरवणुका शांततेत काढल्या, तिसर्या मिरवणुकीत हे सगळं कसं घडलं? असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
केजरीवाल यांच्यावरही हल्लाबोल
याचबरोबर, दिल्ली पोलिसांच्या अटकेवरही असदुद्दीन ओवेसींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, "अन्सार नावाची व्यक्ती, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो एका मुलाला समजावून सांगत आहे की त्याला का अटक करण्यात आली. पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत. अन्सारचे जे हिंदू शेजारी आहेत, ते स्वतःच त्याच्या चारित्र्याची स्तुती करत आहेत. अन्सार दंगलीवर नियंत्रण ठेवत होता." याशिवाय, असदुद्दीन ओवेसींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिमांवरच आरोप केले आहेत. ते निवडणुकीत मुस्लिमांचे हित साधतात आणि आता असे बोलत आहेत."
मी दिल्ली सरकार आणि मोदी सरकारवर आरोप करत आहे. एकतर्फी कारवाई केली जात आहे. मशिदीसमोर झेंडे लावले जातात, तो व्हिडिओ कोणी का दाखवत नाही. तुम्ही निवडक कायदा लागू करत आहात. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, असे असदुद्दीन ओवेसींनी सांगितले. तर दिल्ली पोलिसांवर आरोप करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, 'तुमचे अपयश लपवण्यासाठी किमान खोटे बोलू नका.'
नेमक काय घडलं?
जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या. त्यात एका स्थानिक व्यक्तीसह आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले. यादरम्यान एका पोलिसाला गोळीही लागली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली असून आणखीही काही जणांना अटक होणार आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी बंदुका आणि दारूगोळाही जप्त केला आहे.
शनिवारच्या हिंसाचारानंतर पोलीस एका महिलेला चौकशीसाठी घेऊन गेले होते, असे सांगण्यात येत आहे. यानंतर सोमवारी जहांगीरपुरी परिसरातील सुमारे 50 महिलांनी निषेध आणि दगडफेक सुरू केली. पोलिसांनी ज्या महिलेला ताब्यात घेतले आहे, ती आरोपी सोनूची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. सोनूने शनिवारी गोळीबार केला होता. महिलेला पोलीस चौकशीसाठी नेल्यानंतर सोमवारी वेगवेगळ्या घरांच्या छतावरुन पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली.