नवी दिल्ली : फेब्रुवारीत ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांची वेगाने सुनावणी होण्यासाठी दिल्ली पोलिसांनी २० वकिलांचे एक मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मंडळावर हिंसाचाराशी संबंधित ७०० प्रकरणांची जबाबदारी असणार आहे. तसेच या खटल्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाचीही मागणी करण्यात येणार आहे.
दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांनी गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. आता यासंदर्भात नायब राज्यपाल अनिल बैजल यांना परवानगीसाठी पत्र लिहिण्यात येणार आहे. हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी अलीकडेच बैठक आयोजित केली होती. यात आतापर्यंत ८०० आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. लॉकडाऊनच्या कालावधीत तपासाचा वेग मंदावता कामा नये, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असल्यामुळे गेल्या एक महिन्यातही अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तर-पूर्व पोलीस हिंसाचार, तोडफोड आणि लुटपाटीच्या वेळी झालेली मारहाण या घटनांचा तपास करीत आहे, तर गुन्हे शाखेच्या सर्व तुकड्या खुनाच्या प्रकरणांचा तपास करीत आहे....तरच जलदगतीने सुनावणी होईलहिंसाचाराशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्ट किंवा राऊज अव्हेन्यू कोर्टात विशेष न्यायालय स्थापन होणे महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा वकिलांच्या मंडळाने व्यक्त केली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.