Delhi Violence: दिल्ली दंगलीमध्ये केंद्र सरकारचा हात, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 01:10 PM2020-02-26T13:10:14+5:302020-02-26T13:14:24+5:30
दिल्ली दंगलीमध्ये विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य केले गेले आहे, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली -दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये दिल्लीतील विविध भागात झालेल्या दंगलीमध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीमागे केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.
दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, ‘दिल्ली दंगलीमध्ये विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य केले गेले आहे. तसेच विशिष्ट समाजातील लोकांची धरपकड केली जात आहे. पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत नाही आहे. दिल्लीत दंगल भडकवण्यामागे एकप्रकारे केंद्र सरकारचा हात आहे. या दंगलीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे.’
दरम्यान, सीएए विरोधातील आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर मंगळवारी दिल्लीत हिंसाचाराच आगडोंब उसळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 20 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णलायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.
संबंधित बातम्या
Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण
Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली
Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'