नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेला हिंसाचार आणि दंगल रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील दंगलीवरून बुधवारी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने काँग्रेसकडून एक निवेदन राष्ट्रपतींना दिले. तसेच दिल्लीतील दंगल रोखण्यात अपयशी ठरलेले गृहमंत्री अमित शाह यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केली.
दिल्ली दंगलीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई व्हावी, तसेच दंगलीतील पीडितांना मदत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनामधून राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियंका गांधी, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ‘ गृहमंत्री आणि पोलीस दिल्लीत उसळलेला हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले. दिल्ली आणि केंद्र सरकारने दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले. हिंसाचारामुळे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक जखमी झाले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.’
दरम्यान, सोनिया गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दंगल उसळल्यावर ती रोखण्यासाठी पावले उचलण्याऐवजी केंद्र आणि दिल्ली सरकारने मुकदर्शक बनणे पसंत केले. गृहमंत्री अमित शाह यांनी काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे ३४ जणांचा जीव गेला. अमित शाह परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरले. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली.
संबंधित बातम्या