नवी दिल्ली : दिल्लीच्या ईशान्य भागात गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण आणण्यात बुधवारी पोलीस व निमलष्करी दलाला काहीसे यश आले आहे. तुरळक घटना वगळल्यास हिंसाग्रस्त भाग शांत राहिला. या हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या २७ झाली असून, जखमींची संख्या २०० वर गेली आहे. त्या भागात अद्याप तणाव असून, तिथे विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ताबडतोब लष्कर तैनात करावे, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.दिल्लीत तणावाची स्थिती कायम असून, निमलष्करी दलाने पथसंचलन केले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही आज हिंसाग्रस्त भागाचा दौरा केला. सीएएविरोधी आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. त्याबद्दल सर्व स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त झाल्याने, गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांबरोबरच सीमा सशस्त्र बल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आदींच्या शेकडो तुकड्या तैनात केल्या.सुरक्षा यंत्रणांकडून ध्वजसंचलन, नागरिकांशी संवाद, शांततेचे आवाहन आदी करण्यात येत असल्याने परिस्थिती काही अंशी नियंत्रणात आहे. मात्र, अद्यापही तणाव कायम आहे. जनजीवन पूर्वपदावर केव्हा येणार, याबाबत मात्र अनिश्चितता आहे.मृतांची संख्या २७ झाल्याची माहिती गुरू तेग बहादूर (जीटीबी) हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली. जवळपास दोनशे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबारापासून बचाव करण्यासाठी जखमी झालेले, तसेच बचावासाठी घराच्या छतावरून उडी मारलेले जखमी उपचारांसाठी दाखल आहेत. अनेकांना डोक्याला मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, जखमींचे उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.या भागांतील सर्व मेट्रो स्टेशन्ससुरू असली तरी प्रवाशांची संख्या अत्यल्प आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा करायला हवा. त्यामुळे जनतेत विश्वास वाढेल.- उच्च न्यायालय, दिल्लीमोदींचे शांततेचे आवाहनसर्वांनी शांती आणि बंधुभाव ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आज केले. परिस्थितीची मी माहिती घेतली आहे.पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणा परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काम करीत आहेत. शांतता, सौहार्द हे आपल्या संस्कारांमध्येच आहे. त्यामुळे लवकरच या परिसरात शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.शहांनी राजीनामाद्यावा- सोनिया गांधीकाँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हिंसाचाराचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे. दिल्लीतील हिंसाचार काबूत राखण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.हिंसाचारात मरण पावलेल्यांना आज दिल्ली विधानसभेत श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. आमदारांसह विविध पक्षांचे नेते मदत कार्यात सहभागी झाले आहेत. दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव आणि सतीश गोलचा यांनी सीलमपूर, मौजपूर परिसराला सलग दुसऱ्या दिवशी भेट देऊन पाहणी केली.पोलिसाच्या कुटुंबीयांना मदतदंगलखोराच्या गोळीबारात मृत पावलेल्या पोलिसाच्या घरी जाऊ न मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी एक कोटी रुपयांची मदत देऊ केली. त्यांनी घरच्या मंडळींचे सांत्वनही केले.
Delhi Violence: ईशान्य दिल्लीतील मृतांची संख्या २७; परिस्थिती नियंत्रणात, तणाव कायमच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 5:33 AM