नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचा वणवा शमला असला तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या दंगलीत कित्येकांनी आपलं सर्वस्व गमावलंय, तर मृतांची संख्या 42 वर पोहोचली आहे. दिल्लीतील दंगली 42 जणांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गमावलंय. शेकडो कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. तर, हजारो-लाखो नागरिकांनावर या दंगलीचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे सीएए आणि एनआरसीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात सहभागी नसल्यांनाही या दंगलीनं उद्धवस्त केलंय.
दिल्लीत तब्बल 4 दिवसानंतर शुक्रवारी अनुचित घटना घडली नाही. हिंसाग्रस्त भागातील स्थिती सुधारत असून जीवनावश्यक वस्तूही मिळत आहेत. तिथे 7 हजार सशस्त्र पोलीस व निमलष्करी जवान तैनात आहेत. घरे जळालेल्यांना 25 हजार रुपयांची मदत देणे सुरू आहे. या हिंसाचारात 500 हून अधिक वाहने जळाली, 52 दुकाने लुटण्यात आली. परिस्थितीत सुधारणा झाल्याने जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. मात्र, अनेकांचे संसार या दंगलीत उध्वस्त झाले आहेत. हातावरचं पोट असलेल्या शेकडो नागरिकांना याचा फटका बसला आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंगने एक फोटो शेअर केला आहे.
फातिमानामक एका 62 वर्षीय वृद्ध महिलेचा फोटो हरभजनसिंगने शेअर करत दिल्लीतील दंगलीत नेमकं कुणाचं घर जळालं, हेच सांगण्याचा प्रयत्न भज्जीनं केला आहे. फोटोमधील फातिमा यांचा सीएएच्या समर्थनार्थ किंवा विरोधातही सहभाग नाही. सीएएबद्दल त्यांना काहीच घेणं-देणं नाही. मात्र, दिल्लीतील दंगलीत त्यांचही दुकान जळालंय. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी फातिमा फळांचा गाडा चालवत होत्या. मात्र, त्यांचं सर्वस्व असलेली ही फळांची गाडीही दिल्लीतील दंगलीचा निशाणा बनली. या दंगलीत त्यांचा गाडा भस्मसात झाला आहे. हातावरचं पोट असलेल्या फातिमा यांनी डोळ्यातून अश्रूंच्या धारा काढत आपलं दु:ख व्यक्त केलं.
दोन दिवसांपूर्वीच 50 हजार रुपयांची संत्रा विकायला आणलं होतं. पण, या दंगेखोरांनी माझं दुकान जाळलं, आता मी हे नुकसान कसं भरू, असे म्हणत फातिमा यांनी रडायला सुरुवात केली. हरभजन सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फातिमा यांचा फोटो शेअर केला असून दिल्लीतील दंगलीच सर्वसामान्यांचंच मोठं नुकसान झाल्याचं हरभजनने सूचवलंय.