यवतमाळ - दिल्लीत भडकलेल्या जातीय दंगलीची आग आता विझली असती तरी तिच्या झळा अद्याप जाणवत आहेत. या दंगलीमुळे आतापर्यंत सुमारे ४६ जणांचा बळी गेला आहे. या राजधानीत भडकलेल्या या हिंसाचारासाठी भाजपा नेते कपिल मिश्रास तसेच भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची प्रक्षोभक विधाने जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र दिल्लीत दंगल भडकण्यास कारणीभूत ठरलेल्यांमध्ये अजून एका नावाची भर पडण्याची शक्यता आहे. देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयू विद्यार्थी उमर खालीद याच्या एका भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उमर खालिद हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन लोकांना करताना दिसत आहे.
उमर खालिद हा विद्यार्थी नेता आपल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत आला आहे. आता त्याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ हा यवतमाळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने हे प्रक्षोभक भाषण डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पूर्वी १७ फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे दिले होते.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले असताना पूर्वोत्तर दिल्लीत दंगल भडकली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर उमर खालिद याच्यावर दिल्ली पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारतात येतील तेव्हा आपण रस्त्यावर उतरले पाहिजे. २४ तारखेला ट्रम् येतील तेव्हा आपण त्यांना सांगू की, भारत सरकार देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे सरकार गांधीजींच्या शिकवणीची अवहेलना करत आहे. देशातील जनता देशातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढत आहे, हे आपण अमेरिकेच्या राष्ट्रपतींसमोर आणू. त्या दिवशी सर्वजण रस्त्यावर उतरतील.’असे उमर खालिद या व्हिडीओत म्हणत आहे.
संबंधित बातम्या
तुमच्यात हिंमत असेल तर शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या : उमर खालिद
Delhi Violence: दिल्लीत पुन्हा एकदा दहशतीचं सावट; रविवारी रात्री 'त्या' दोन तासांत काय घडलं?
'आप अन् काँग्रेस'नेच दिल्लीच्या दंगली भडकावल्या, आठवलेंचा आरोप
दरम्यान, उमर खालिदचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जेहादी शक्तींनी दंगल भडकवण्याचे कारस्थान आधीच रचले होते. ज्यादिवशी डोनाल्ड ट्रम्प भारतात येतील त्यादिवशी तुकडे तुकडे गँग रस्त्यावर उतरेल आणि देशाला बदनाम करायचा प्रयत्न करेल हे आधीच ठरले होते. १७ फेब्रुवारीला उमर खालिदने दिलेले भाषण हा त्याचाच पुरावा आहे, असा आरोप भाजपा प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी केला आहे.