नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगळीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. दिल्लीत दंगल उसळल्यानंतर ७२ तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले. दिल्लीत झालेला हिंसाचार आणि सध्याच्या परिस्थितीसाठी गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधातील आंदोलनांना हिंसक वळण लागून दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत दिल्लीती सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.
सोनिया गांधी म्हणाल्या, 'कटकास्थान रचून दिल्लीत हिंसाचार घडवला गेला आहे. भाजपाचे अनेक नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक वक्तव्ये करत असल्याचे आपण पाहिलेच होते. दरम्यान, दिल्लीत हिंसाचार माजल्यानंतर ७२ तासांपर्यंत दिल्ली पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. या काळात १८ जणांचा बळी गेला. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. शेकडोजण रुग्णालयात दाखल आहेत. अनेकांना गोळी लागली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीमधील गल्लीबोळात अजूनही हिंसाचार सुरू आहे. दिल्लीत आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहे. या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारून अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे. '
' दिल्लीतील हिंसाचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारही तितकीच जबाबदार आहे. शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली सरकारने प्रशासनाला सक्रिय केले नाही. त्यामुळे दिल्लीतील हिंसाचार ही केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित अपयशाचा परिणाम आहे, ' असे सोनिया गांधी म्हणाल्या.