नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. दिल्लीतील परिस्थितीवर काँग्रेस राजकारण करत असल्याचा दावा करताना गृहमंत्री अमित शाह परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे.
दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. दिल्लीत दंगल उसळल्यानंतर ७२ तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली होती.
यावर जावडेकर म्हणाले की, दिल्लीतील हिंसाचारावर राजकारण करण्यात येत आहे. काँग्रेसच्या या धोरणामुळे पोलिसांचे मनोबल खचत आहे. गृहमंत्री अमित शाह सर्व पक्षांशी चर्चा करून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. हिंसेसाठी सरकारला दोष देश देणे म्हणजे गलिच्छ राजकारण असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोनिया गांधींनी दिल्लीतील हिंसचारावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देताना जावडेकर म्हणाले की, गृहमंत्री पहिल्या दिवसापासून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते जिथं असतात तिथून काम करतात. शिख दंगलीत ज्यांचे हात काळे झालेले आहेत, तेच आज कोण कुठय असा प्रश्न विचारत असल्याचा टोला जावडेकरांनी सोनिया गांधींना लगावला आहे.
दरम्यान सोनिया गांधी यांचे वक्तव्य दुर्वैवी आणि निंदणीय आहे. अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येऊन शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी इच्छाही जावडेकरांनी व्यक्त केली.