नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळला होता. मात्र, सध्या दिल्लीत शांतता आहे. या हिंसाचारामुळे नुकसान झालेल्या भागात सध्या मदतकार्य सुरू असून येथील जनजीवन आता पूर्ववत होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह बुधवारी काँग्रेसच्या एका प्रतिनिधीमंडळाने दिल्लीतील हिंसाचार उसळलेल्या भागांना भेट दिली.
बुधवारी राहुल गांधी काँग्रेस नेत्यांबरोबर ईशान्य दिल्लीतील बृजपुरी भागात दाखल झाले. या भागात राहुल गांधी यांनी हिंसाचारावेळी आंदोलकांनी पेटवून दिलेल्या शाळेला भेट दिली. या शाळेला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, "ही शाळा आहे, हे भारताचे भविष्य आहे. तिला द्वेष व हिंसाचाराने जाळले आहे. यामुळे कोणाचाच फायदा झाला नाही. हिंसा व द्वेष विकासाचे शत्रू आहेत. भारताला जे विभाजन केले जात आहे आणि जाळले जात आहे, यामुळे भारताला काहीच फायदा नाही आहे."
याचबरोबर, सर्वांना मिळून या ठिकाणी प्रेमाने काम करावे लागेल, असे आवाहन राहुल गांधी यांनी करत सांगितले की, "भारताला जोडूनच पुढे जाता येऊ शकते. जगात भारताची जी प्रतिमा आहे, तिला धक्का बसला आहे. बंधुभाव आणि एकता आपली ताकद होती, तिला या ठिकाणी जाळण्यात आले. यामुळे भारताचे नुकसान होत आहे."
राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, कुमारी शैलजा, अधीर रंजन चौधरी, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, के सुरेश, गौरव गोगोई आणि ब्रह्म मोहिंद्रा उपस्थित होते. दरम्यान, दिल्लीत 24 फेब्रुवारीला उसळलेला हिंसाचार तीन दिवस सुरु होता. या हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.