नवी दिल्ली - सीएएवरुन ईशान्य दिल्लीतील पेटलेलं हिंसक आंदोलनामुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. अनेकांची घरे जाळण्यात आली, दुकानं लुटली, कित्येक लोकांचा जीव दंगलीत गेला. जाफराबाद, मौजपूर अशा विविध भागात रस्त्यांवर दगडांचा ढिग पडला होता. हातात काठ्या, रॉड घेऊन आंदोलनकर्ते हिंसा माजवत होते.
या हिंसक आंदोलनात एका युवक हातात बंदूक घेऊन हवेत गोळीबार करतो, त्याच्यासमोर एक पोलीस उभा राहतो. त्यावेळी त्या पोलिसाच्या मनात नेमकं काय सुरु होतं? हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक दहिया या पोलिसाने सांगितले की, जेव्हा दंगलखोर बंदूक घेऊन माझ्यासमोर येत होता त्यावेळी मी हातातल्या काठीने त्याला आव्हान दिले. त्यात मला यश मिळालं. त्यानंतर दंगलखोर शाहरुखने दुसरीकडे एक राऊंड फायर करुन तिथून निघून गेला असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्याक्षणी त्याने माझ्यावर बंदूक रोखली होती तेव्हा मला कशाचीही भीती नव्हती. देशाचं रक्षणं करणे माझं कर्तव्य आहे. यापुढेही असा प्रसंग कधी आला तरी मरणाला घाबरणार नाही असं मत पोलीस दीपक दहिया यांनी मांडले. शाहरुखला मंगळवारी दिल्ली पोलिसांनी बरेली येथून अटक केली. सोशल मीडियावर पोलीस दीपक दहिया आणि दंगलखोर शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसाचं कौतुक करण्यात येत आहे. शाहरुखला पकडल्याने आनंद झाला पण लोकांनी शांतता राखायला हवी असं आवाहन दीपक दहिया यांनी केलं आहे.
सध्या दीपक वजीराबादच्या दिल्ली पोलीस प्रशिक्षण केंद्रात हवालदार पदावर कार्यरत आहे. ईशान्य दिल्लीत हिंसाचार पेटल्यानंतर केंद्रातील सर्व जवानांना त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. दीपकने याबाबत सांगितले की, मी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी ड्युटी करत होतो. अचानक एक युवक अंदाधूंद गोळीबार करत समोर येत होता. त्यावेळी माझ्या हातात काठी होती अन् त्याच्या हातात पिस्तुल होती. मी तरीही त्याला न घाबरता सामोरा गेलो. त्याला कुठेही असं जाणवू दिलं नाही माझ्या हातात काठी असल्याने मी घाबरलो आहे, निर्धास्तपणे मी भिडलो असं दीपकने सांगितले.