नवी दिल्ली : सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 20 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णलायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयाबैठक घेतली. दिल्लीतील परिस्थितीवर डोवाल लक्ष ठेवून आहेत. डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले.
अमित शहा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये द्वेष पसरवणारे संदेश, पोलीस आणि आमदारांमधील समन्वय, सुरक्षा बलांची तैनाती आणि अफवांना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर मुख्यत्वेकरून चर्चा झाली. अमित शहा यांच्यासोबतची बैठक आटोपल्यावर केजरीवाल म्हणाले की, ''दिल्लीत उसळलेला हिंसाचार थांबावा असेच सर्वांना वाटते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भात आज बोलावलेली बैठकही सकारात्मक झाली आहे. हा दिल्लीचा प्रश्न आहे आणि सर्वपक्षीय मिळून त्यासाठी प्रयत्न करू.''
भजनपुरा आणि खजुरी खसमध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाल्याने पोलिसांनी या भागात संचलन केले. दिल्लीतील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांना सीआरपीएफमधून माघारी बोलावून दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) म्हणून तत्काळ नियुक्त केले. दिल्ली पोलिसांनी रात्रीपर्यंत 11 एफआयआर दाखल करत वीसहून अधिक लोकांना अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण
Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली
Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'