नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरून दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची मध्यरात्री बदली करण्यात आली. दरम्यान, या बदलीविरोधात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकार न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे, अशा शब्दात त्यांनी न्यायमूर्तींची बदली करणाऱ्या केंद्र सरकारवर टीकास्र सोडले आहे.
न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा निषेध करणारे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. त्यात त्या म्हणतात, ‘सध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाही. पण ती खेदजनक आणि लाजीरवाणी बाब आहे. देशातील कोट्यवधी लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मात्र सरकार असे प्रकार करून न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे.’
दरम्यान, दिल्लीत सुरु असणाऱ्या हिंसाचाराबाबतच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली दिल्ली हायकोर्टातून पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनमधून न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीश एस, मुरलीधर यांची बदली पंजाब हरियाणा हायकोर्टात केली. माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या समितीने १२ फेब्रुवारीला दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्याची शिफारस केली होती.
संबंधित बातम्या
Delhi Violence : आग का क्या है, पल दो पल मे लगती है..., राहत इंदौरींचा भावुक शेर
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारावर रोहित शर्मानं व्यक्त केली चिंता, म्हणाला...
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे जखमी झालेल्या व्यक्तींचे संरक्षण आणि चांगल्या उपचारांसाठी दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या निवासस्थानी मध्यरात्री सुनावणी झाली होती. मुस्तफाबादमधील एका रुग्णालयातून अॅम्ब्युलन्ससाठी सुरक्षित रस्ता देण्यात यावा, तसेच जखमींना सरकारी रुग्णालयात पाठवावे, असे निर्देश कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले होते.