नवी दिल्ली - गेल्या आठवडाभरापासून दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थक यांच्यातील तणावामुळे वातावरण पेटलं आहे. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ४० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. हजारो गाड्या जाळण्यात आल्या, दुकानांना आग लावली, या हिंसाचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला.
भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी लोकांना भडकवण्याचे काम केले असा आरोप केला जातो, त्यांच्यासह अन्य दोन नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानेही दिले. जाफराबाद, दयालपूर, मौजपूर अशा अनेक भागात हिंसाचारामुळे लोकं दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत. अशातच रविवारी पुन्हा एकदा आलेल्या एका मॅसेजमुळे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली का? अशी भीती लोकांना वाटत होती.
रस्त्यावर लोकं पळू लागली. दुकानांचे शटर बंद होऊ लागले. अनेकांचे मोबाईल फोन खणाणले, ईशान्य दिल्लीत रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा खळबळ माजली. अचानक आलेल्या अफवेमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं. नेमकं दिल्लीत रविवारी संध्याकाळी घडलं काय? असा प्रश्न उपस्थित झाला असेलच.
संध्याकाळी ७ च्या सुमारास व्हॉट्सअप ग्रुपमधून जैतपूर, जसोला, मदपूर येथे दंगल सुरु झाली आहे अशा अफवा पसरू लागल्या. ही अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने टिळक नगर स्टेशनचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलं. व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून मॅसेज व्हायरल होऊ लागले, त्यानंतर नांगलोई, सूरजमल स्टेडियम, बदरपूर, तुगलकाबाद, उत्तम नगर, नवादा मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले. एकापाठोपाठ एक अफवा वाढू लागल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली. विविध भागातून पोलिसांना हिंसाचार भडकल्याचे कॉल्स येऊ लागले. जवळपास ४०० पेक्षा अधिक कॉल्स पोलिसांना आले.
जनकपुरी येथे डाबरीमध्ये राहणाऱ्या अंकित यांनी सांगितले की, संध्याकाळी ८ वाजता गल्लीत गर्दी होती. यातच अचानक काही लोक जोरजोरात ओरडत आले, दंगल सुरु झाले, गोळीबार करण्यात येत आहे. हे ऐकताच लोकांची पळापळ सुरु झाली. कॉलनीचं गेट बंद करण्यात आलं. दुकानं बंद करण्यात आली. रस्त्यावरुन लोक धावत असताना जोरात ओरडू लागले. काही लोक घराच्या बाल्कनीत उभे होते, कोणालाही काही समजत नव्हते. काही लोक सांगत होते टिळकनगर येथे दंगल झाली आहे. जवळपास २ तास असं वातावरण ईशान्य दिल्लीत पाहायला मिळालं. थोड्या वेळानंतर पोलिसांची गाडी आली त्यावेळी वातावरण शांत झालं. या दरम्यान, लोकांचे मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले होते.
अशा प्रसंगी काय करावे?
- सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या अफवा दुसऱ्यांकडे शेअर करु नये, कारण त्याची खातरजमा करणं कठीण असतं. त्यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं.
- कोणत्याही प्रकारची हिंसा भडकेल अशा पोस्ट सोशल मीडियात टाकू नये, तसेच याला पुढाकार घेणाऱ्यांचे समर्थन करु नये.
- आपल्या परिसरात, कॉलनीत छोट्या छोट्या बैठका घेऊन आपापसात संवाद ठेवावा, त्यामुळे अफवा दूर होण्यास मदत होईल.
- आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली सुरु असल्यास तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यावी