नवी दिल्ली - सीएए, एनआरसीला होणाऱ्या विरोधानंतर दिल्लीत उसळलेल्या भयानक जातीय दंगलीमुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्लीतील काही भागात दंगल उसळली असताना पिस्तूल उंचावत गोळीबार करणाऱ्या एका दंगलखोराला केवळ हातात काठी घेऊन सामोऱ्या गेलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचे छायाचित्र काल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. दरम्यान, सदर बहादूर पोलीस हेड कॉन्स्टेबलने त्यावेळच्या संपूर्ण प्रसंगाची कहाणी प्रसारमाध्यमांना सांगितली आहे. ‘जर माझ्या समोर कुणी मृत्युमुखी पडले असते तर त्याचे दु:ख नेहमी माझ्या मनात राहिले असते,’ त्या प्रसंगाबाबत अशी प्रतिक्रिया या पोलीस हेड कॉन्स्टेबलने दिली आहे.
दीपक दहिया असे या बहादूर पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव असून, ते हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहेत. ३१ वर्षीय दीपक दहिया हे २०१० मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून दिल्ली पोलीस दलात दाखल झाले होते. त्यानंतर ते हेड कॉन्स्टेबलची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. दरम्यान, सध्या ते वजिराबाद येथे प्रशिक्षण घेत आहेत.
सोमवारी घडलेल्या घटनेबाबत दहिया सांगतात की, ‘दंगल उसळली तेव्हा मी मौजपूर चौक परिसरात तैनात होतो. अचानक सारे काही बदलू लागले. हिंसक वातावरण निर्माण झाले. लोक एकमेकांवर दगडफेक करू लागले. मी जसा या दंगलखोरांच्या दिशेने तसा मला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. एक व्यक्ती पिस्तूल ताणून गोळीबार करत असल्याचे मी पाहिले. त्याचे लक्ष विचलित व्हावे म्हणून मी त्वरित दुसऱ्या बाजूला वळलो.’
तणावाच्या परिस्थितीत स्वत:च्या प्राणांपेक्षा सर्वसामान्यांच्या जीविताच्या रक्षणास प्राधान्य द्यावे, अशी शिकवण पोलीस प्रशिक्षणावेळी दिली जाते, असे दहिया यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘सदर तरुण पुढे पुढे येत होता. त्याचे लक्ष विचलित व्हावे म्हणून मी त्याच्या दिशेने वळलो. कुणी अन्य व्यक्ती त्याच्या मार्गात येऊ नये असे मला वाटत होते. कुणाचा मृत्यू होऊ नये याला मी प्राधान्य देत होतो.’ हे माझे कर्तव्य आहे आणि ते केलेच पाहिजे, असे मला वाटत होते.
संबंधित बातम्या
Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली
Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'
Delhi Violence: दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित कट?; 'या' भागातून आणला होता दगडांचा स्टॉक!
दहिया यांची पत्नी आणि दोन मुली कुटुंबीयांसह सोनिपत येथे राहतात. सोमवारी दिल्लीत घडलेल्या या प्रकाराची त्यांना मंगळवारी सकाळपर्यंत कल्पनाही नव्हती. मात्र हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यांचे कुटुंबीय घाबरले. ‘मी झाल्या प्रकाराबाबत कुटुंबीयांना फार काही सांगितले नव्हते. मात्र हे फोटो पाहिल्यानंतर माझ्या पत्नीने मला फोन केला. ती खूप घाबरली होती. छायाचित्रांमध्ये माझा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र माझ्या जॅकेटवरील निळ्या पट्ट्यांवरून तिने मला ओळखले.
विशेष बाब म्हणजे दहिया यांचे कुटुंबीय संरक्षण क्षेत्रातच कार्यरत आहेत. त्यांचे वडील भारतीय तटरक्षक दलामध्ये तैनात होते. तर दहिया यांचे दोन लहान भावांपैकी १ जण दिल्ली पोलिसांत आहेत. तर दुसरा तटरक्षक दलात सेवेत आहे.