नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये दिल्ली दंगलीचा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली. त्यातच लोकसभेमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या खासदरांमध्ये धक्काबुक्की झाली. गोंधळाच्या या वातावरणात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्या सकळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत चालला होता. त्यानंतर आता दुसरा टप्पा 2 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे. दरम्यान, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी दिल्लीतील हिंसाचाराचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला.
विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली. दरम्यान, ज्यांच्या कार्यकाळात १९८४ सारखी घटना घडली ते आज इथे गोंधळ घालत आहेत, मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो, असा टोला संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला लगावला.
लोकसभेमध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. काँग्रेसच्या खासदारांनी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेमध्ये बॅनर फडकावले. तसेच ट्रेजरी बेंचपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा खासदार रमेश बिधुडी आणि काही अन्य खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात धक्काबुक्की झाली.
संबंधित बातम्या
Delhi Violence: ट्रम्प येतील तेव्हा रस्त्यावर उतरा, उमर खालिदच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ व्हायरल
दिल्लीतील हिंसेचा मुद्दा संसदेत गाजणार; राज्यसभेत विरोधकांची चर्चेची मागणी
शाह यांच्या टीकेला तृणमूलचे प्रत्युत्तर; दिल्ली सांभाळण्याचा गृहमंत्र्यांना दिला सल्ला
विरोधी पक्षांकडून घालण्यात आलेल्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरुवातीला दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर पुन्हा गोंधळास सुरुवात झाली. अखेरीस अखेरीस लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.