नवी दिल्ली - सीएएविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने देशाच्या राजधानी दिल्लीत हिंसक वळण घेतलं आहे. जाफराबाद येथे सुरु असलेल्या आंदोलनावरुन सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. या दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेक सुरु केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणात भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्याविरोधात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप होत आहे. याबाबत भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी कपिल मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गौतम गंभीर म्हणाले की, कोणताही व्यक्ती असो, कपिल शर्मा असो वा अन्य कोणीही त्याने फरक पडत नाही, कोणत्याही पक्षाचा माणूस असला तरी भडकाऊ भाषण देणाऱ्यावर कडक कारवाई होणं गरजेचे आहे असं मत त्यांनी व्यक्त केले.
पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी भजनपुरा-मौजपूर येथील हिंसक घटनेत जखमी झालेले डीसीपी अमित शर्मा यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. जाफराबाद हिंसाचारात डिसीपी अमित शर्मा गंभीररित्या जखमी झालेत. सोमवारी रात्री त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या अमित शर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या उत्तरेकडील भागात जो हिंसाचार सुरु आहे, त्यात कोणत्याही पक्षाचा माणूस असो, काँग्रेस असेल, आम आदमी पक्षापासून अन्य कोणीही, या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, जर कपिल मिश्रा यांचाही यात समावेश असेल तर त्यांच्यावरही गुन्हा नोंद करावा अशी मागणी भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी केली.
काय बोलले होते कपिल मिश्रा?शाहीनबागनंतर जाफरबाद आणि चांद बाग येथे रोड बंद केल्यामुळे कपिल मिश्रा यांनी रस्त्यावर येऊन धमकी दिली होती. दिल्ली पोलिसांनी तीन दिवसाच्या आत रस्ता खुला करावा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापर्यंत आम्ही शांततापूर्वक आंदोलन करु, मात्र ३ दिवसानंतरही रस्ता खुला झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु त्यानंतर आम्ही दिल्ली पोलिसांचेही ऐकणार नाही. या भाषणानंतर दिल्लीत हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जात आहे.
दिल्लीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यूदिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यासाठी उत्तर दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांची संख्या ७ वर पोहचली आहे. जाफराबाद येथून हिंसाचाराला सुरुवात झाली असून त्याचे पडसाद अन्य भागातही उमटताना दिसत आहेत.