नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराबाबत काँग्रेसने स्थापन केलेल्या तथ्य शोधन समितीने आपला अहवाल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना सादर केला आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात केंद्र आणि दिल्ली सरकार यांना आलेल्या अपयशाचा यात उल्लेख करण्यात आला आहे.
दिल्लीतील हिंसाचाराची सखोल माहिती घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी एक समिती स्थापन केली होती. यात मुकुल वासनिक, तारिक अन्वर, सुष्मिता देव, शक्तिसिंह गोहिल आणि कुमारी सेल्जा यांचा यात समावेश होता. या हिंसाचारात ५३ लोकांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक जण जखमी झाले. दिल्लीतील दंगलीदरम्यान लोकांच्या तक्रारी दूर करण्यात केंद्र आणि राज्य सरकार यांना अपयश आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. यात म्हटले आहे की, भाजपच्या काही नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे संघर्ष झाला.या समितीने ईशान्य दिल्लीत दंगलग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबियांची हॉस्पिटल आणि त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या संघर्षात मारले गेलेले दिल्ली पोलीसचे हेड कॉन्स्टेबल आणि आयबी आॅफिसरच्या घरीही या समितीने भेट दिली.