नवी दिल्ली - सीएए कायद्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा हिंसक वळण लागलं. सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले. या हिंसाचारात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. यातच उत्तर पूर्व दिल्लीतील खजूरी परिसरातून तीन दिवसापूर्वी परीक्षा देण्यासाठी गेलेली शाळकरी १३ वर्षाची शाळकरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे.
पोलिसांनी सांगितले की, ८ वीच्या वर्गात शिकणारी सोनिया विहार येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहते. सोमवारी सकाळी ती शाळेत जाण्यासाठी गेली, जवळपास साडेचार किमी अंतरावर तिची शाळा आहे. मात्र ती अद्याप परतली नाही. रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय असणाऱ्या तिच्या वडिलांनी सांगितले की, मला संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी मुलीला शाळेतून आणण्यासाठी जायचं होतं. पण आमच्या भागात सुरु झालेल्या दंगलीमुळे मी अडकलो. तेव्हापासून माझी मुलगी बेपत्ता असल्याचं ते म्हणाले.
आम्ही मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंद केली आहे, मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे असं पोलीस म्हणाले तर मौजपूरच्या विजय पार्कमधील एका रहिवाशाने सांगितले की, दोन दिवसांपासून शिव विहारच्या एका घरात अडकलेल्या त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाला नाही.
एका वयोवद्ध मोहम्मद सबीर म्हणाले की, मदीना मस्जिदजवळीळ शिव विहार येथे माझं घर आहे. माझी दोन मुले त्याठिकाणी राहतात तर विजय पार्क येथे दोघं राहतात. परिसरात सुरु असणाऱ्या दंगलीमुळे आमचा काहीही संपर्क होत नाही. आम्हाला काही लोकांनी घेरलं आहे असं त्यांनी फोनवरुन सांगितले. त्यानंतर ते आता कुठे आहेत याची कल्पना नाही असं ते बोलले, सध्या परिसरात तणाव असल्याने आम्हाला सहकार्य करा असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे.
मौजपूर, जाफराबाद, चांदबाग, घोंडासह दिल्लीच्या पूर्वभागात सोमवारी हिंसाचार वाढला. यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तणावग्रस्त भागात पोलीस, राखीव पोलीस दल यांच्यासह अन्य जवान तैनात आहेत. बुधवारी काही भागात शांतता पसरली पण लोक आजही दहशतीखाली आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी १८ तक्रारी नोंदवल्या आहेत. तर १०८ जणांना अटकही केली आहे.