Delhi Violence: दिल्लीत हिंसाचार घडविण्यासाठी उत्तर प्रदेशातून आले होते ३०० लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 04:18 AM2020-03-12T04:18:25+5:302020-03-12T04:18:51+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा : दोषींची गय केली जाणार नाही
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : दिल्लीत हिंसाचार करण्यासाठी उत्तर प्रदेशातून तीनशे लोक आले आहेत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील हिंसाचारावरील चर्चेला उत्तर देताना लोकसभेत केला.
चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्ली पोलीस आणि गृहमंत्र्यांवर आरोप करीत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तीन दिवस दिल्ली जळत असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. गृहमंत्री काय करीत होते? पंतप्रधान अजूनही काही बोलत नाहीत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनाच का पाठविण्यात आले? हिंसाचारग्रस्तांचे अश्रू पुसण्याची गृहमंत्र्यांची जबाबदारी नव्हती का? दिल्लीतील हिंसाचार हा लाजिरवाणा कलंक असून, याला गृहमंत्रालय सर्वस्वी जबाबदार आहे.
चौधरी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनीही गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
७०० एफआयआर दाखल चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांंनी सांगितले की, दिल्लीतील हिंसाचाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. जगापुढे खरे आले पाहिजे. दिल्ली पोलिसांना शब्बासकी देत त्यांनी दिल्ली पोलिसांवरील आरोप फेटाळले. माझ्या सूचनेनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोबाल यांना पाठविण्यात आले होते. पूर्ण घटनाक्रम सांगत त्यांनी दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी केव्हा काय-काय प्रयत्न करण्यात आले, याची तपशीलवार माहिती दिली. आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल करण्यात आले असून, २,६४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा अटक करण्यात आलेली आहे. एक गौप्यस्फोट करताना गृहमंत्री म्हणाले की, लोकांकडून मिळालेले व्हिडिओ तपासले जात आहेत.
गृहमंत्र्यांनी सत्य नाही सांगितले - अधीर रंजन
गृहमंत्र्यांचे निवेदन संपत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत सभात्याग केला. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला की, गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणारे निवेदन केले. सत्य सांगितले नाही. आमच्या चुकीमुळे घडले, यापुढे असे होऊ देणार नाही, असे त्यांना म्हणता आले असते. दिशाभूल करणारे निवेदन ऐकायचे नसल्याने आम्ही सभात्याग केला.