नवी दिल्ली - दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या 'फॅक्ट फाईंडींग' अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्लीतील उत्तर-पूर्व भागात झालेली हिंसा एकतर्फी आणि सुनियोजित असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसेत सर्वाधिक नुकसान मुस्लीम समुदायाच्या घरांचे आणि दुकानांचे झाले आहे. भाजप नेता कपिल मिश्रा यांनी दिलेल्या चिथावणीखोर भाषणानंतरच या परिसरात हिंसा भडकली. खजुरी खास परिसरातील लोकांनी ही माहिती दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्या आहे. यासंदर्भात कपिल मिश्रा यांची बाजू ऐकून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
दोन पानांच्या अहवालात म्हटले की, हिंसा काळात अधिकाधिक नुकसान करण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला. तसेच हिंसा करणाऱ्यांनी ज्या घराचे आणि दुकानाचे नुकसान केले तिथे लूटही झाली होती. दिल्ली पोलिसांचे या अहवालात कौतुक करण्यात आले आहे. तसेच हिंसा पीडितांना देण्यात येणार मदत तुटपुंजी असून ती वाढविण्याची आवश्यकताही व्यक्त करण्यात आली. भरीव मदतीशिवाय येथील कुटुंब पुन्हा उभे राहू शकणार नसल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
आयोगाचे सदस्य करतार सिंह कोचर यांनी हिंसा झालेल्या चांद बाग, जाफराबाद, ब्रिजपुरी, गोकुळपुरी, मुस्तफाबाद, शिवविहार, यमुना विहार, भजनपुरा आणि खजुरी खास परिसराचा दौरा केला. यावेळी नुकसान झालेल्या शाळा आणि मशिदींची देखील पाहणी करण्यात आली. अशी माहिती आयोगाचे चेअरमन जफरूल इस्लाम खान यांनी दिली.