नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारात आम आदमी पक्षाचे नगरसेवक मोहम्मद ताहिर हुसैन यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. मोहम्मद हुसैन आणि त्यांच्या समर्थकांवर गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप लावला जात आहे. पोलिसांपासून पळ काढत असलेले ताहिर हुसैन यांनी एक व्हिडिओ जारी करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
मात्र कोण आहेत ताहिर हुसैन? ताहिर दिल्लीच्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा नाहीत.पण पूर्वोत्तर दिल्लीमध्ये शाहदरा, नेहरु नगर, चांदबाग परिसरात ताहिर हुसैन यांचा दबदबा आहे. मुस्लिमांमध्ये त्यांना विशेष मान आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये नेहरु नगर विभागातून आपच्या तिकिटावर ते नगरसेवक म्हणून निवडून आले. व्यवसायाने उद्योगधंदा असणाऱ्या ताहिर हुसैन यांची १८ कोटीपर्यंत संपत्ती आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद नाही. ताहिरने यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नाही.
ताहिर हुसैन यांनी जारी केलेल्या व्हिडिओत म्हटलंय की, दिल्लीत हिंसाचार भडकवण्यामागे माझी भूमिका नाही, मोठ्या प्रमाणात आलेल्या गर्दीने घराचा गेट तोडून आत येण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी मी पोलिसांना बोलावलं. पोलीस आल्यानंतर माझ्या घराची पाहणी केली. कोणीही दंगेखोर सापडला नाही. त्यानंतर मी पोलिसांच्या मदतीने जीव वाचवून तेथून निघालो. मी एक खरा, चांगला भारतीय मुस्लीम आहे. मी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी काम करतो. मी स्वत:चा जीव वाचवून एका नातेवाईकाच्या घरी थांबलो आहे. मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो की, या संपूर्ण प्रकाराची माझा काहीही संबंध नाही. मी असं घाणेरडे राजकारण करणार नाही असं त्यांनी सांगितले.
अंकित शर्मा यांच्या भावाने एका चॅनेलशी बोलताना सांगितले, सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली जो हिंसाचार होतोय, लोकांना मारलं जात आहे. ते बंद करावं. माझं घर उद्ध्वस्त झालं. अंकीत कामावरुन परतत असताना साडेचार वाजता गल्लीच्या बाहेर त्यांना खेचून नेलं. विभागाच्या नगरसेवकाचे लोक त्याला घरातून घेऊन गेले. अनेक व्हिडिओ असे दिसतायेत ज्यात नगरसेवक ताहिर हुसैन घराच्या गच्चीवर रॉडसह उभा आहे. त्यांच्यासोबत समर्थकही होते. भाजपा नेते अमित मालवीय यांनी ट्विट करुन ताहिर हुसैन यांना अटक करण्याची मागणी केली आहे.