नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असून गेल्या दशकभरापासूनचा हा सर्वाधिक पाऊस आहे. यामुळे दिल्लीत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचू लागले असून विमानतळावरदेखील रनवेसह परिसर जलमय झाला आहे. येथील पाणी पाहून हा दिल्लीचा विमानतळ आहे यावर विश्वास बसत नाहीय. दिल्लीला येणारी विमाने दुसरीकडे वळविण्यात आली आहेत. (Parts of Delhi Airport waterlogged following heavy rainfall in the national capital; visuals from Indira Gandhi International Airport)
हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 24 तासांत दिल्लीत 97 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुढे आणखी काही तास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे दिल्लीच्या आयजीआय एअरपोर्टच्या टर्मिनल 3 मध्ये पाणी घुसले आहे. यामुळे लोकांना त्रास होत आहे. विमानतळावर टॅक्सीतून येणाऱ्या प्रवाशांना आत जाण्यासाठी पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. अनेक लोक पावसामुळे विमानतळावरच थांबले आहेत. रनवेच्या आजुबाजुला पाणी भरले आहे.
पाणी भरल्याने त्याचा परिणाम विमान वाहतुकीवरही झाला आहे. चार देशांतर्गत आणि एक आंतरराष्ट्रीय फ्लाईट दिल्लीवरून जयपूरला वळविण्यात आली आहे. विमानतळ प्रशासनाचे म्हणणे आहे की, अचानक पाऊस झाल्याने काही वेळातच एअरपोर्ट कॉरिडॉरमध्ये पाणी साचले. आमच्या टीमने यावर काम केले आणि पाणी बाहेर काढण्याची सोय केली आहे.
हवामान विभागाने सांगितले की, दिवसभर ढग असतील. मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तापमान 31 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.